महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ ऑक्टोबर । कास परिसरातील ग्रामस्थांच्या आर्थिक उन्नतीसाठी येथील पर्यटन वर्षभर सुरू राहावे, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. प्री -वेडिंग शूटिंगसाठी येथे स्पॉट विकसित करण्यासाठी नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. दरम्यान, महोत्सवासाठी 30 लाख रुपये खर्च झाला असून, तो नियोजन समिती व पर्यटन विभागाच्या माध्यतातून केल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, सेवा पंधरवड्यात जिल्ह्यातील 55 हजार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. फेरफारच्या सात हजार प्रकरणांपैकी केवळ 460 प्रकरणे बाकी राहिली आहेत. पीएम किसान योजनेचे ई-केवायसीचे काम 93 टक्के पूर्ण झाले आहे. ई-पीक पाहणीत शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, तसेच नुकसान झालेल्या शेतकNयांना भरपाई देण्यावर आमचा भर राहणार आहे.
कास महोत्सवाचा चांगला अनुभव आला असून, काही त्रुटी राहिल्या होत्या. त्या आगामी काळात होणाऱ्या महोत्सवात दूर केल्या जातील. कासचे पर्यटन वर्षभर चालू राहावे, याकडे विशेष लक्ष देणार आहोत. त्यासाठी परिसरातल्या गावांतील लोकांची आर्थिक उन्नती साधण्यावर आमचा भर असेल. बचतगटांच्या महिलांना त्यांच्या उत्पादनाचे स्टॉल उभारून विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध केली जाईल. कास परिसरात प्री-वेडिंग शूटिंग होत असते. ते लपूनछपून न करता शासनाकडून स्पॉट डेव्हलप केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.