राज ठाकरेंच्या पत्रावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया ; फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले “त्यांनी…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ ऑक्टोबर । अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपामध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हं असतानाच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या पत्रावर पक्ष नेतृत्व आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीकांत शिंदे यांनी देवेंद्र फ़डणवीस चर्चा करुन योग्य निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मागाठणे विधानसभा मतदारसंघातील दहिसर पूर्व येथे आमदार प्रकाश सुर्वे व विभागप्रमुख यांच्या शाखा क्रमांक ४ चा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. ते आपले कार्यकर्ते, पदाधिकारी तसचं वरिष्ठ आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील”.

ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मोठ्या प्रमाणात लोक पक्षासोबत जोडले जात आहेत. आम्ही जमिनीशी जोडलेलो असून, जमिनीवर उतरुन काम करतो असंही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं?
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली. राज यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असे आवाहन केले. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार होण्याने रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखरीच शांती मिळेल. यामुळेच भाजपाने ही निवडणूक लढवू नये व त्यांच्या पत्नी निवडून येतील असे पाहावे, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या ऋुतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. लोकप्रतिनिधींचे निधन झाले व त्यांच्या कुटुंबातील कोणी पोटनिवडणूक लढवीत असल्यास शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा असल्याचे सांगत पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली. तर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी हा निर्णय सुसंगत ठरेल. यामुळेच भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असं आवाहन केले आहे.

गांभीर्याने विचार करू – फडणवीस
ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठविले असले तरी आता शेवटच्या क्षणी काही भूमिका घ्यायची असेल तर एकटय़ाला निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी पक्षात चर्चा करावी लागणार आहे, वरिष्ठांशी बोलावे लागणार आहे. आमच्याबरोबर बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ िशदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. आम्ही या पत्राचा गांभीर्यानं विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चेअंती घेतला जाईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रताप सरनाईक यांचेही पत्र
‘बाळासाहेबांची शिवसेने’चे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *