महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ ऑक्टोबर । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून भाजपने अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक (Andheri East By poll) लढवू नये, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच मुंबई भाजपची धुरा सांभाळणारे आशिष शेलार (Ashish Shelar) मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ‘राज ठाकरेंच्या पत्राचा विचार करु’ असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस कात्रीत सापडले असून स्वपक्षातील नेत्याचं ऐकायचं की राज ठाकरेंचं म्हणणं ऐकून महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचं दर्शन देशाला घडवायचं, हा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मेघदूत’ बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकील मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) उपस्थित होते. पोटनिवडणुकीत दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील उमेदवार मैदानात असेल तर सहानुभूतीची लाट असते. त्यातच राज ठाकरे आणि शरद पवार यांनीही भाजपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनावर भाजप नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली.
मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. आपली पूर्ण तयारी झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तर आशिष शेलार यांचाही पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह आहे. पटेल विजयी होतील, असा विश्वास त्यांनाही वाटतो. खरं तर, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसंच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मतदारांचा कौल जाणून घेण्याची प्रातिनिधीक संधी मिळणार आहे. त्यामुळे बॅकफूटवर जाणं शेलार-पटेलांना पटत नाही. दोलायमान अवस्थेमुळे भाजपकडून यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.