महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ ऑक्टोबर । सणासुदीच्या तोंडावर राज्य सरकारकडून करोना संसर्गवाढीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच करोनाच्या नव्या विषाणू संदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वेही जारी करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाकडून नुकताच देण्यात आलेला हा इशारा राज्यातील करोना रुग्णसंख्येत या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत १७.७ टक्क्यांनी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटी यांनी याबाबत पुष्टी करताना सांगितले की, राज्याने ओमायक्रॉनच्या एक्सबीबी प्रकारचा अहवाल दिला आहे. जो BA.2.75 पेक्षा घातक आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारा नवीन प्रकार आहे. एक्सबीबी हा ओमायक्रॉनच्या BA.2.75 आणि BJ.1 या सबव्हेरिएंटचा हायब्रिड प्रकार आहे. जो ऑगस्टमध्ये सिंगापूरमध्ये शोधला गेला. या प्रकारामुळे तिथे करोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय आवटी यांनी हेही सांगितले की BA.2.3.20 आणि BQ.1 सह इतर कोविड-19 च्या विषाणूंची प्रकारणही महाराष्ट्रात नोंदवली गेली आहेत. जे देशभरात अन्य ठिकाणी आढळलेले आहेत.
राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे –
१. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
२. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.
३. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा
४. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.
५. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे
६. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.
हिवाळा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. पण त्याच बरोबर युरोपमध्ये करोनाची नवीन लाट येण्याची चिंता वाढत आहे. ओमायक्रॉन सबवेरियंट्स BA.4 आणि BA.5 यांनी उन्हाळ्यात सर्वत्र दहशत माजवली होती. अजूनही त्यांचे संक्रमण सुरू आहे. पण चिंतेची बाब म्हणजे आता ओमिक्रॉनचे नवीन सबवेरिएंट्स दिसू लागले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शास्त्रज्ञ ओमायक्रॉनच्या शेकडो नवीन प्रकारांचा मागोवा घेत आहेत.