राज्यात दिलासा:दिवाळीपासून पावसाला सुट्टी, 20 ऑक्टोबरपासून पाऊस माघारी ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ ऑक्टोबर । नैऋत्य मोसमी वारे राज्यातून माघार घेत असल्याने विविध जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. सध्या परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र, पावसाची शक्यता खूपच कमी आहे, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान बेटाजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून बेटाच्या पश्चिमेला २० ऑक्टोबरपर्यंत हवेच्या कमी दाबाचे तर धनत्रयोदशीला अतितीव्र कमी दाबाचे (डिप्रेशन) क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोरच्या आग्नेयेला दूर पश्चिम-मध्य समुद्रात दिवाळी पाडवा-भाऊबिजेदरम्यान कदाचित चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा सध्या तरी महाराष्ट्रावर परिणाम होणार नसून आठ दिवसांनंतर याबाबत चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याचे खुळे यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात आज पाऊस मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील खान्देशापासून ते सिंधुदुर्ग, कोल्हापूरपर्यंत १९ ऑक्टोबरला जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातुरात जोरदार पावसाची अधिक शक्यता आहे. २० ऑक्टोबरपासून पावसाचा जोर काहीसा कमी होऊन केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात बुधवारपासूनच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

नांदेड : ४ जणांचा वीज पडून मृत्यू नांदेड जिल्ह्यात मंगळवारी हिमायतनगर, किनवट, नायगाव, अर्धापुरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वीज अंगावर पडून ४ जणांचा मृत्यू झाला. हिमायतनगरच्या सिबदरा-मंगरूळच्या शेतमजुराचा व लोहा तालुक्यातील धावरी तांडा येथील तीन ऊसतोड कामगारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता
उत्तर आणि मध्य भारतातून मान्सून २० ऑक्टोबरपासून माघारी जात आहे. मात्र, दिवाळीत दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ घोंगावत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात २२, २३, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे केरळ, तामिळनाडूसह १० राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

५ अंशांपर्यंत तापमान खाली : हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचलात आणखी जोरदार बर्फवृष्टी शक्य आहे. तसेच या परिसरात शीतहलर येण्याची शक्यता आहे. २० तारखेनंतर सकाळी व सायंकाळी तापमान ३ तेे ५ अंश राहू शकते. हवामान विभागाने अलर्ट दिल्याने ओडिशा सरकारने दिवाळीत २३ ते २५ ऑक्टोबरच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या. समुद्रकिनाऱ्यावर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *