महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ ऑक्टोबर । कोरोनामुळे दोन वर्षे ठप्प पडलेला पर्यटन व्यवसाय यंदा खऱ्या अर्थाने “दिवाळी’ साजरी करणार आहे. दिवाळीच्या सुट्यांसाठी देशभरात विमान आणि हॉटेलची विक्रमी बुकिंग होत आहे. विशेष म्हणजे विमान तिकिटे ४०% महागली असतानाही देशांतर्गत प्रवासाचे बुकिंग १२४%, तर आंतराष्ट्रीय प्रवासाचे १३३% नी वाढले आहे. देशांतर्गत हॉटेलच्या बुकिंगमध्येही ५७% टक्क्यांची वाढ झाली आहे. नवी दिल्ली, मुंबई, गोवा व बंगळुरूला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
कोरोनाचे निर्बंध पूर्णत: शिथिल झाल्याने यंदा दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठी अाहे. ऐनवेळी भाडेवाढीची शक्यता असल्याने जाणकार पर्यटक हॉटेल व विमान प्रवासाची तिकिटे आगाऊ बुक करतात. कोरोनापूर्व २०१९ ची दिवाळी व कोरोनापश्चात यंदाच्या दिवाळीत प्रमुख ८ ट्रॅव्हल अॅग्रिगेटर कंपन्यांकडे झालेल्या बुकिंगवरून यंदा “पर्यटनाची दिवाळी’ होणार असल्याचे दिसते.
देशातील हॉटेल्स झाली फुल्ल एका रात्रीसाठी थ्री स्टार लॉजिंगचे दर २०१९ च्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी वाढले आहेत. सरासरी किराया ५,८४० रुपये आहे. पर्यटकांच्या पसंतीच्या १० शहरांतील लॉजिंगचे सरासरी दर असे…
नवी दिल्ली 5257 मुंबई 8257 गोवा 7522 बंगळुरू 7270 चेन्नई 7192 कोलकाता 4156 जयपूर 8700 म्हैसूर 5989 अंदमान 5100 श्रीनगर 5797 कोची 6590
परदेशातील हॉटेल २४% महागले; दुबई, बँकॉक, सिंगापूरला पसंती २०१९ च्या तुलनेत परदेशी पर्यटनासाठी विमान बुकिंगमध्ये 133% तर रिटर्न तिकिटात 40% वाढ झाली आहे. तरीही मोठ्या संख्येने पर्यटक परदेशवारीला निघाले आहेत.
यंदा विमान प्रवासाचे सरासरी रिटर्न तिकीट ६७,५४३ रुपये आहे. काेरोनापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये ते सरासरी ४०,४३७ रुपये इतके होते. परदेशात एका रात्रीच्या मुक्कामासाठी थ्री स्टार हॉटेलचा सरासरी दर १६,४३५ रुपये आहे. २०१९ च्या दिवाळीत तो १२,४३५ रुपये होता. यंदा त्यात २४% वाढ झाली आहे.
परदेशातील टॉप १० शहरे आणि हॉटेलचे सरासरी दर असे… दुबई रु.28,563 बँकाॅक रु.25,413 सिंगापूर रु.31,056 न्यूयॉर्क रु.93,630 बाली रु.48,292 मालदीव रु.25,899 लंडन रु.63,480 इस्तंबूल, तुर्की रु.50,332 ऑस्ट्रेलिया रु.84,580