महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ ऑक्टोबर । अमरावतीमध्ये पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा विरुद्ध प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यामध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. ‘महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे असे राणा दाम्पत्य आहे’ अशी जळजळीत टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये राजकीय फटाके फुटण्याची चिन्ह आहे.
अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली.
अमरावतीत दिवाळी निमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य घरोघरी मोफत किराणा वाटत आहे, यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली. ‘खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत. तसंच महाठग आणि महा औलाद कमी आहे का? असा सवाल करत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडलं.
तसंच, ‘इथून खिसे कापायचे, गोरगरिबांच्या खिशात हात घालायचा, लोकशाहीचे पतन करायचं व राजकारणाची ऐसी की तैशी करायची’ असं म्हणत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली.
दरम्यान, बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमध्ये याआधीही शाब्दिक युद्ध रंगले होते. आमदार रवी राणा यांनी थेट बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. ‘जिथे पैसा तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा न भय्या, सबसे बडा रुपय्या!. मंत्रिपद मिळावं म्हणून दबाव आणणार नाही किंवा गुवाहाटीला जाणार नाही. मंत्रिपद मिळो अथवा न मिळो मी कायम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिपाई बनून राहीन, असं म्हणत रवी राणांनी बच्चू कडूंना डिवचले होते. तेव्हांपासून राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे.