Diwali Shopping : दिवाळीत अशी होईल बचत ; करा स्मार्ट शॉपिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० ऑक्टोबर । दिवाळीपूर्वी बाजारात सर्वत्र खरेदीची धूम दिसत आहे. बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. सर्वत्र विविध ऑफर्सचा पाऊस पडताना दिसतो. मात्र, सूट व सवलतींच्या नादाने लोक अनेकदा अनावश्यक खरेदी करून आपले बजेट बिघडवून घेत असतात. स्मार्ट पद्धतीने नियोजन करून खरेदी केली, तर अनावश्यक खर्च टळून सणही उत्साहात साजरा होईल. सणासुदीच्या काळातील खर्च कसा नियंत्रणात ठेवावा, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

सणाच्या खर्चाचे बजेट निश्चित करा – सर्वप्रथम सणाच्या खर्चाचे बजेट निश्चित करा. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिकचा खर्च टळेल. नीट नियोजन केले तर मिळणाऱ्या बोनसमध्येही दिवाळी आनंदात साजरी होऊ शकते. त्यासाठी आपल्या खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करा. आणि कटाक्षाने पाळा. आवश्यकतेनुसार वस्तूंचा क्रम ठरवा. गरजेच्या वस्तूंचा क्रम आधी लावा.

डिस्काउंटच्या नादात अनावश्यक खर्च टाळा – ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक कंपन्यांनी बंपर सूट व सवलती जाहीर केल्या आहेत. गरजेच्या वस्तू खरेदी केल्या, तर सूट फायदेशीर ठरत असते. कधी कधी अनावश्यक खर्च होण्यास सूट व सवलती कारणीभूत होतात. गरज नसतानाही काही वस्तूंची खरेदी होते. ते टाळा. कंपन्या तुम्हाला खरेदीला उद्युक्त करण्यासाठी सूट जाहीर करीत असतात, हे लक्षात ठेवा.

बजेटमध्येच खरेदी करा; ईएमआय पर्याय निवडा – अनेक लोक सणाच्या काळात क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करतात. बोनस मिळेल त्यातून बिल अदा करू, असा त्यांचा यामागचा विचार असतो. ही अजिबात चांगली सवय नाही. भविष्यातील कमाईवर कधीच खर्च करू नका. हातात जेवढा पैसा आहे, तेवढ्यातच खरेदी करा. डाऊन पेमेंटवर मोफत सहायक उपकरणाऐवजी शून्य टक्के ईएमआयचा पर्याय निवडा. जेवढे बजेट आहे, तेवढीच खरेदी करा.

खरेदीपूर्वी तुलना करा : खरेदी करण्यापूर्वी वस्तूंच्या किमतींची इतर वेबसाइटवर तुलना करा. याशिवाय ऑनलाइन-ऑफलाइन अशी तुलनाही करा. काही वस्तू ई-कॉमर्स वेबसाइटवर स्वस्त मिळू शकतात, तर काही वस्तू स्थानिक दुकानदार स्वस्त देऊ शकतात. त्यामुळे खरेदीसाठी थोडा गृहपाठ आवश्यक आहे. वस्तू जेथे स्वस्त मिळेल, तेथूनच खरेदी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *