पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ; गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ ऑक्टोबर । पुणे रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सोमवारपासून (२४ ऑक्टोबर) पुढील आठ दिवस प्लॅटफॉर्मचे तिकीट दहा रुपयांऐवजी ३० रुपये करण्यात येणार आहे. शनिवारी (२२ ऑक्टोबर) रात्री गर्दीत अचानक त्रास झाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता.

पुणे रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठी गर्दी दिसून येत आहे. शनिवारी रात्री पुणे-दानापूर गाडीसाठीही मोठी गर्दी झाली होती. एक प्रवासी गर्दीतून नातलगांसमवेत गाडी पकडण्यासाठी जात असताना त्याला अचानक त्रास झाला. हा व्यक्ती पूर्वीपासूनच आजारी होता. त्रास झाल्यामुळे नातलगांनी त्याला मोकळ्या जागेत आणले. तेथे तो बेशुद्ध झाला. काही वेळाने स्थानकातील डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले . बौधा मांझी (मूळ रा. बिहार) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो पुण्यात मजुरी कामासाठी आला होता.


प्लॅटफॉर्मवर प्रवाशाला सोडविण्यासाठी अनेकजण येत असल्याने स्थानकावरील गर्दीत वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने पुणे रेल्वेने दिवाळीच्या कालावधीत प्लॅटफॉर्मच्या तिकिटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्मचे तिकीट दहा रुपयांऐवजी ३० रुपयांना मिळेल. नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर आणि स्थानकाच्या परिसरात विनाकारक गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *