महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ ऑक्टोबर । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठा संकल्प केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वत:चा प्रचार करणार नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे. इतकच नव्हे तर फोटो आणि कटआऊटही लावणार नाही, असं नितीन गडकरींनी जाहीरपणे सांगितलं. निवडणुकीचा रागरंग बदलून टाकणारं गडकरींचं हे वक्तव्य म्हणावं लागेल.
‘मी अशा जागेवरून निवडणूक लढतो, तिथून मला निवडणूक लढू नका, असं सांगण्यात आलं होतं. यावेळी मी साडेतीन लाख मतांनी जिंकलो. पुढच्या वेळी 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकणार,’ असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.
‘मी फोटो लावणार नाही, कट आऊट लावणार नाही. खाण्या-पिण्याची बातच नाही. निवडणूक माझ्या हिशोबाने चालेल. ज्यांना मत द्यायचं त्यांनी द्या, ज्यांना द्यायचं नाही त्यांनी देऊ नका. लोक मत देतील, याचा मला विश्वास आहे,’ असं नितीन गडकरी म्हणाले.
लोकसभेची आगामी निवडणूक आता दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत नितीन गडकरी कटआऊट लावतात का नाही, 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतात का नाही, हे स्पष्ट होईलच, पण नागपूरची निवडणूक आणि तिथला यंदाचा प्रचार निश्चित वेगळा असेल.