महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ ऑक्टोबर । तो 30 ऑक्टोबर 1984 चा दिवस होता. इंदिरा गांधी ओडिसामधील भुवनेश्वरमध्ये भाषण करत होत्या. तिथे त्यांनी ‘उद्या कदाचित मी या जगात नसेन. मला मरणाची याची पर्वा नाही. मी माझं आयुष्य जगले आहे. माझे संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेत घालवल्याचा मला अभिमान आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे करत राहीन. माझ्या मृत्यूनंतरही माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला मजबूत बनवण्यासाठी वापरला जाईल.
या भाषणानंतर 24 तासातच म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 रोजी संध्याकाळी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्यात राहील्या नाहीत अशी बातमी आली. इंदिराजींच्या दोन रक्षकांनीच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ही बातमी येऊन धडकली आणि संपूर्ण देश स्तब्ध झाला. इंदिराजींना स्वत:च्या मृत्यूची चाहुल लागली होती, असे डॉक्टर कृष्णप्रसाद माथूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
31 ऑक्टोबर 1984 च्या थंडीतील ती सकाळची वेळ होती. थंडीत धुक्य़ाला बाजूला सारून सूर्यप्रकाश डोकावत होता. इंदिराजींसाठी त्या दिवसाचे खूपच टाइट शेड्युल होते. तयार झाल्यावर इंदिरा गांधी त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडल्या.
कॉन्स्टेबल नारायण सिंह उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री घेऊन इंदिराजींच्या शेजारी चालत होते. त्याच्या मागे त्याचे पीए आरके धवन हे होते. त्या दिवशी इंदिराजी नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होत्या. त्यांनी काळ्या बॉर्डरची केसरी रंगाची साडी परिधान केली होती. त्यावर त्यांनी मॅचिंग काले सँडलही घातले होते.अभिनेते पीटर उस्तीनोव हे इंदिराजींची त्या दिवशी मुलाखत घेणार होते. त्यामुळे ते त्यांची वाट पाहत होते. कॅमेऱ्यासमोर जायचे असल्याने इंदिराजींनी नेमके त्या दिवशी बुलेटप्रूफ जॅकेट घातले नाही.
इंदिरा गांधींचे सुरक्षा रक्षक बिअन्त सिंग गेटवर आणि कॉन्स्टेबल सतवंत सिंग एन्ट्री बूथवर उभे होते. इंदिराजी नेहमीप्रमाणे पुढे गेल्या आणि त्यांनी बिअन्त आणि सतवंत यांना हसून नमस्कार केला. यावेळी बिअन्तने 38 बोरचे रिव्हॉल्व्हर इंदिरा गांधी यांच्यावर ताणले. तेव्हाही न घाबरता इंदिरा गांधी त्याला म्हणाल्या की, हे तू काय करत आहेस?, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि काही सेकंदांच्या फरकाने त्याने गोळीबार सुरू केला. गोळी इंदिराजींच्या पोटात लागली. यानंतर बिअन्तने इंदिरा गांधींवर आणखी 4 गोळ्या झाडल्या.
बिअन्तसिंगच्या पलीकडे दुसरा शीख रक्षक 22 वर्षीय सतवंत सिंग, स्टेनगन घेऊन उभा होता. हे सर्व पाहून तो घाबरला. तेवढ्यात बिअन्त ओरडला- ‘गोली मारो.’ हे ऐकून सतवंत आपल्या रिव्हॉल्वरमधील 25 गोळ्या इंदिरा गांधींवर झाडल्या.
या हल्ल्यानंतर इंदिरा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या अंगावरची साडी रक्ताने पूर्णपणे भिजली होती. नंतर पुढच्या सोळा मिनिटात म्हणजेच 9.32 वाजता त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फुप्फुस, यकृत, मणका अशा सर्व अवयवांमध्ये गोळ्या घुसल्याने दुपारी 2.20 वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याचं जाहीर करण्यात आलं.
राहुल गांधी यांच्यासोबत बॅडमिन्टन खेळायचा बेअन्त सिंग
उपनिरीक्षक बेअंत सिंग हे ९ वर्षे इंदिरा गांधींच्या सुरक्षेत तैनात होते. हत्येच्या काही दिवस आधी ते इंदिरा गांधींसोबत लंडनला गेले होते. इंदिरा गांधीही बेअंतला खूप मानत आणि सरदारजी म्हणत. इंदिराजींच्या मृत्यूनंतर तीन दशकांनंतर राहुल गांधींनी बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांना त्यांचे मित्र म्हणून स्मरण केले. बेअंटने मला बॅडमिंटन खेळायला शिकवल्याचे त्याने सांगितले होते.
इंदिराजींच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारं ब्ल्यू स्टार ऑपरेशन काय होते
साधारण 40 वर्षांपूर्वी पंजाबमध्ये शीख दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्याचे नेतृत्व जरनैल सिंह भिंडरांवाले करत होते. तेही सुवर्णमंदिरात बसून. 5 जून 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शीख दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार सुरू करण्याचे आदेश दिले.
या कारवाईत भिंद्रनवाला यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला. या कारवाईत सुवर्ण मंदिराच्या वास्तूचेही नुकसान झाले. यामुळे इंदिराजीसह शीख समाजातील एक वर्ग नाराज झाला. यामुळेच शीख समाज त्यांच्या विरूद्ध कट कारस्थान करत होता. अखेर त्यांनी डाव साधला आणि आजच्या दिवशी इंदिराजी सारखे नेतृत्व आपण गमावले.