महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ ऑक्टोबर । महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने खास करून गुजरातला गेल्याने विरोधी पक्षांकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिंदे गट आणि भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आज मोठी माहिती दिली आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे मोठ्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प मंजूर केल्याबद्दल केंद्र सरकारचे विशेष करून पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यानुसार रांजणगाव येथे संबंधित कंपनी M/s IFB Refrigeration Ltd ने कामही सुरू केलं आहे. ही कंपनी ४५० कोटींची गुंतवणूक करणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर (EMC) अंतर्गत औद्योगिक, ग्राहक उपयोगी, सौर ऊर्जा उत्पादनांसह इतर अनेक वस्तूंची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे आभार मानतो, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.