महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ नोव्हेंबर । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजारी असतानासुद्धा ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबिरासाठी शिर्डीत हजेरी लावली. शिबिरासाठी शरद पवार यांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा ‘देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी शरद पवार फक्त चार ते पाच मिनिटे बोलले.
पवार यांनी आज आपलं भाषण उभे न राहता बसूनच केले. त्यांच्या हाताला बँडेज लावलेले दिसत होते. त्यांचे उर्वरित भाषण दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले. यामध्ये शरद पवार यांच्या सुरुवातीच्या काळापासूनचा आढावा घेण्यात आला.
कार्यकर्त्यांना संबोधताना शरद पवार म्हणाले की, राज्याच्या भागातून अनेक कार्यकर्ते अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. मी कालपासून शिबिरामधील सर्वांचे भाषण रुग्णालयात बसून ऐकले. आज मला सविस्तर बोलणे शक्य नाही. पण, येत्या 15 दिवसानंतर मी माझे नियमित काम सुरू करु शकतो, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
तसेच तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येने आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचे म्हणणे ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. राज्यात परिवर्तन करण्याची संधी आपल्याला मिळले. आता पूर्ण ताकदीने पक्ष मजबूत करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
शिबिर आटोपल्यावर रुग्णालयात
शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असताना त्यांनी आज राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरास उपस्थिती लावली. राष्ट्रवादीचं शिर्डीत दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू झाले. आज या शिबिराचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आज शिबिर आटोपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहेत.