महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपचार घेत असल्याचं राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. (ncp president Sharad Pawar discharged breach candy hospital )शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. सकाळी साडे दहा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी एका वृत्तसंस्थेली दिली आहे.
मागील आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार दिला जाणार होता. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. अखेर आज आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.
उपचारादरम्यानच पवारांनी शिर्डी येथे पक्षाच्या शिबिराला हजेरी लावली होती. प्रकृती अस्वस्थ असतानादेखील ते मेळाव्यासाठी उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी अवघ्या 3 मिनिटाचं भाषण केलं होत.
मागील वर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना 30 मार्च रोजी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचं निदान झालं होतं. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले.