महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । कृषीमंत्री अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांची 24 तासांमध्ये मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
‘विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे’, असं म्हणत महेश तपासे यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंबाबत वापरले अपशब्द
‘सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे, त्यामुळे अब्दुल सत्तार यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल,’ असा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.
दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर उद्योगमंत्री आणि त्यांचेच सहकारी उदय सामंत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करत नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.