Dapoli Resort Case : शिवसेनेचा हा बडा नेता गोत्यात; कोर्टाने बजावले समन्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा जामीन कोर्टाने मंजूर केल्याने शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उत्साह आहे. पण दुसरीकडे शिवसेनेचा एक खंदा शिलेदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दापोली कोर्टाने साई रिसॉर्ट घोटाळ्यासंदर्भात अनिल परब यांना समन्स बजावले आहे आणि १४ डिसेंबरला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सीआरझेडमध्ये बांधकाम केल्याच्या आरोपांप्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोर्टात तक्रार दाखल केली होती. दापोली तालुक्यातील मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी सुनावणी सुरू आहे. चार दिवसांपूर्वी पंचायत समिती गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी भा.द.वि. ४२० नुसार अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

दापोली कोर्टाने माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह तिघांना समन्स बजावले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ अन्वये समन्स जारी करण्यात आले आहे. १४ डिसेंबरच्या सुनावणीला हजर रहाण्याचे आदेश दापोली कोर्टाने दिले आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या दाखल केलेल्या खटल्यावर बुधवारी ९ नोव्हेंबरला दापोली कोर्टात सुनावणी झाली. पर्यावरणसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हा खटला दाखल केला आहे. अॅड प्रसाद कुवेसकर यांनी पर्यावरण विभागाच्या वतीने युक्तीवाद केला.

केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली कोर्टात अनिल परब यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण खात्याचे वकील ऍड. प्रसाद कुवेसकर यांनी दिली. मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनारी बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचे आहे, असा आरोप करत याविरोधात तक्रार करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, पोलीस, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आदी ठिकाणी तक्रार केली होती. या सगळ्यांची दखल घेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून साई रिसॉर्ट आणि सी क्रॉंच रिसॉर्टवर कारवाईचे आदेश राज्य दिले होते. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदार यांच्यामार्फत या दोन रिसॉर्टला नोटीस बजावण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *