महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । कोरोनानंतर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. अनेक कंपन्यांनीही वर्क फ्रॉम होम सुविधा बंद केल्याने कर्मचाऱ्यांना कंपनीत जाऊन काम करावं लागत आहे; मात्र काही कंपन्यांनी हायब्रिड वर्क पॉलिसी अवलंबल्याने अजूनही काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा मिळत आहे. वर्क फ्रॉम होममुळे कंपन्यांचा खर्च वाचत असल्यानं कंपन्या कर्मचाऱ्यांना ही मुभा देतात. आता कॉग्निझंट कंपनी वर्क फ्रॉम होमसाठी पदभरती करणार आहे. ‘कंटेंट टेकगिग डॉट कॉम’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कॉग्निझंट या आयटी कंपनीत प्रोग्रॅमर अॅनालिस्ट ट्रेनी या पदासाठी भरती होणार आहे. या पदभरतीसाठी वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांची निवड केली जाईल. ही पदभरती शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी असेल. बीई, बीटेक, बीसीए, एमसीए, एमई, एमटेक झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
या पदावर काम करणाऱ्या उमेदवारांकडे असलेल्या जबाबदाऱ्यांबद्दलही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, उमेदवारानं कामाबाबतचे प्रश्न, तक्रारी आणि स्पष्टीकरण लगेचच वरिष्ठांना सांगितलं पाहिजे. नियोजित आणि अपेक्षित वेळेत उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी सातत्य राखलं पाहिजे. सहकारी आणि वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारले पाहिजेत. कामासंदर्भात सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे व आवश्यकतेनुसार त्यांचा क्रम लावला पाहिजे. एखादं काम मिळाल्यावर ते पार पाडण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. गरज असल्यास वेळोवेळी कामाबाबतचे अपडेट्स दिले पाहिजेत.
या पदावर काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे कोणती कौशल्यं असली पाहिजेत, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी एखाद्या प्रोजेक्टचा दर्जा टिकवण्यासाठी विविध ठिकाणांहून माहिती मिळवली पाहिजे. क्लायंटच्या मागण्या काय आहेत, तांत्रिक उपलब्धता काय आहे, याबाबतही ज्ञान घेतलं पाहिजे. त्याकरिता क्लायंटच्या प्रोजेक्टची सर्व कागदपत्रं वाचली पाहिजेत. नॉलेज ट्रान्स्लेशन वर्कशॉपला हजेरी लावून तुमच्या प्रोजेक्टबाबत सर्व माहिती मिळवली पाहिजे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तांत्रिक ज्ञान आणि तुमचं शिक्षण यात वेळोवेळी आवश्यक ती भर घातली पाहिजे.
आयटी क्षेत्रात सतत नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. अलीकडेच कॉग्निझंट कंपनीनं काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. त्यामागे उमेदवारांकडे पदासाठी आवश्यक शिक्षण व अनुभव नसल्याचं कारण पुढे आलं होतं. आणखी काही कंपन्यांनीही याच कारणास्तव कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. त्या पार्श्वभमीवर कॉग्निझंटने पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे; मात्र वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांना यासाठी संधी दिली जाणार आहे.