India T20 Captaincy: वर्ल्ड तर कप गेलाच ; रोहित शर्माच्या बाबतीत BCCI टफ कॉल घेणार ; लवकरच मोठी घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर । मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानची ०/१५२ आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडची ०/१७० ही धावसंख्या भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागणारी आहे. दोन्ही सामन्यांत भारतीय संघाला प्रतिस्पर्धींनी सहज पराभूत केले. एडिलेडवर काल झालेल्या उपांत्य फेरीत जोस बटलर व ॲलेक्स हेल्स या दोघांनीच भारताचे १६९ धावांचे लक्ष्य सहज पार करून ऐटीत फायनलमध्ये प्रवेश केला. मागील वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली आणि त्यानंतर भारताची ट्वेंटी-२०तील कामगिरीही चांगली झाली. पण, आयसीसी स्पर्धांमध्ये दबाव झेलण्यास पुन्हा एकदा भारतीय खेळाडू असमर्थ ठरले आणि इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारला. भारताच्या या पराभवानंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये आली आहे. वर्ल्ड कप गमावल्यानंतर आता रोहित शर्मा ( Rohit Sharma) कर्णधारपदही गमावणार असल्याचे संकेत BCCI कडून देण्यात आले आहेत.

पॉवर प्लेमध्ये अतिशय संथ खेळ, यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात आल्या नाही. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या ट्वेंटी-२०त भारतीय फलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत ९च्या सरासरीने धावा केल्या होत्या, परंतु वर्ल्ड कपमध्ये ही सरासरी ६च्या आसपास राहिली. लोकेश राहुल व रोहित शर्मा हे दोघंही दडपणाखाली चांगला खेळ करण्यात अपयशी ठरले. सूर्यकुमार यादव व विराट कोहली या दोघांवर भारतीय संघ विसंबून होता. दिनेश कार्तिकने मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाही, रिषभला पुरेशी संधी मिळाली नाही. अक्षर पटेल अष्टपैलू म्हणून खेळला की केवळ फिरकीपटू हेच समजले नाही. आर अश्विनला त्याची जबाबदारी स्पष्टपणे माहितच नसल्याचे दिसले.

युजवेंद्र चहल पुन्हा एकदा प्रवासी म्हणून संघासोबत राहिला. अक्षर व अश्विन यांचा फलंदाज म्हणूनही उपयोग होईल प्रयत्नात चहलवर अन्याय झाला. इंग्लंडविरुद्ध चहल प्लेइंग इलेव्हनमध्ये असायला हवा होता. अर्शदीप सिंग व भुवनेश्वर कुमार यांनी मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. या सर्व गोष्टी लक्षात घेता बीसीसीआय २०२४मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला आतापासूनच लागली आहे. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे नव्या कर्णधाराची निवड… त्याची सुरुवात न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या ट्वेंटी-२० संघातूनच झाली आहे.

रोहितच्या जागी आता हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. ही निवड केवळ न्यूझीलंड दौऱ्याकरीता नाही, तर भविष्यासाठीही होऊ शकते. ”काही कठोर निर्णय घ्यावेच लागणार आहेत. जखम अधिक गंभीर होण्याआधी त्यावर उपचार गरजेचे आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी संघाला बरेच दिवस आधी पाठवले गेले. दोन मोठ्या दुखापतींनी चिंता वाढवली होती, पण हा खेळाचा भाग आहे. इंग्लंडचा संघही जोफ्रा आर्चर व मार्क वूड शिवाय खेळले, परंतु ते आपल्यासारखे अडखळले नाही. कर्णधारपदाचा मुद्दाही चर्चेत येणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्यावर चर्चा होईल,”असे BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSport कडे बोलताना सांगितले.

रोहित शर्माचं वयही चर्चेचा विषय आहे. तो आता ३५ वर्षांचा आहे आणि २०२४ पर्यंत तो ३७ वर्षांचा होईल. पुढील दोन वर्षांत त्याला वन डे व कसोटी संघांच्या नेतृत्वाच्या जबाबदारीला महत्त्व द्यायचे आहे. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याला विश्रांती दिली गेलीय. २०२४चा वर्ल्ड कप लक्षात घेता कर्णधारपदाच्या जबाबदारीची विभागणी होऊ शकते. त्याला आपण स्प्लीट कॅप्टन्सी असे म्हणू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *