T20 World Cup: अजय जडेजाने भारतीय संघाला सुनावलं ; “घरात एकच वयस्कर व्यक्ती असली पाहिजे, सात असल्या तर मग समस्या आहे,”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर । भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचू न शकल्याने क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली आहे. इंग्लंडने १० गडी राखून केलेल्या दणदणीत पराभवामुळे भारतीय संघाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळालं. या पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत असून पराभवाच्या कारणांवर चर्चा केली जात आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जडेजानेही या पराभवावर स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये झालेल्या अनेक मालिकांमधील रोहित शर्माच्या अनुपस्थितीवर अजय जडेजाने बोट ठेवलं आहे.

रोहित शर्मा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक सीरिजमध्ये अनुपस्थित असताना हार्दिक पांड्या, के एल राहुल अशा अनेक खेळाडूंकडे भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवलं जात आहे. अजय जडेजाने यावर नाराजी जाहीर केली आहे. जर तुम्हाला वर्ल्डकपसाठी संघ तयार करायचा असेल तर संघाला सात नव्हे, तर फक्त एकच वयस्कर (कर्णधार) खेळाडूची गरज आहे असं अजय जडेजाने Cricbuzz शी बोलताना सांगितलं.

“संपूर्ण वर्षभरात त्याने भारताच्या तयारीच्या दृष्टीने त्याने कोणतंही पाऊल उचलल्याचं दिसलं नाही. कदाचित हा मुद्दा रोहितला खटकू शकतो. जर तुम्ही संघाचे कर्णधार असाल तर सतत त्यांच्यासोबत असणं अपेक्षित आहे. गेल्या किती मालिकांमध्ये रोहित शर्मा आपल्या संघासोबत होता? या चर्चा आधीही झाल्या आहेत. संघाचे प्रशिक्षकही दौऱ्यात सोबत जात नाहीत. मग संघ कसा तयार होणार?,” अशी विचारणा अजय जडेजाने केली आहे.

“घरात एकच वयस्कर व्यक्ती असली पाहिजे, सात असल्या तर मग समस्या आहे,” असं स्पष्ट मत अजय जडेजाने मांडलं. अजय जडेजाने या वक्तव्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे भारतीय संघात एकापेक्षा जास्त कर्णधार असण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

२०२१ वर्ल्डकपनंतर विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं होतं. यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेपासून रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. पण जखमी झाल्याने तो ही मालिका खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरोधातील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं.यानंतर रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *