महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – : पेट्रोल-डिझेलच्या विक्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. वेळोवेळी निर्णय बदलत आहे. मात्र आज झालेल्या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंप सुरू करण्यात आले असून पेट्रोल- डिझेल किती द्यायचे, याबाबत कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे नागरिकांना हवे तेवढे इंधन मिळणार आहे.- अली दारूवाला , प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोलियम असोसिएशन
सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळण्याबाबत सुरु असलेल्या गोंधळात जिल्हाधिकार्यांनी बुधवारी पुन्हा नवीन आदेश काढले आहेत. नव्याने काढण्यात आलेल्या या आदेशानुसार आता जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागात नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतेही ओळखपत्र किंवा पासची गरज नाही.
सोमवारी (ता. 4) महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांनी इतर काही दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पेट्रोल पंपांबाबत कोणतेही स्पष्ट आदेश दिले नव्हते. त्यामुळे शहरात गेले तीन दिवस गोंधळाचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.5) खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह पुणे पेट्रोल डिलर असोसिएशन अध्यक्ष समीर लडकत व उपाध्यक्ष सागर रुकारी यांची बैठक झाली.
दरम्यान, त्यामध्ये पंपावर रिक्षा आणि कॅब वगळता सर्वसामान्य नागरिकांनाही पेट्रोल देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र मंगळवारी रात्री पुन्हा या निर्णयात बदल करीत, सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नवीन परिपत्रक जाहीर करत पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व ठिकाणच्या पेट्रोल पंप चालकांनी सर्वसामान्य नागरिकांना पास किंवा ओळखपत्राची मागणी न करता इंधन द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पेट्रोल-डिझेलची विक्री होणार आहे. तर राष्ट्रीय महामार्गावरील पंप शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.