महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । वाहने सावकाश चालवण्याचा सल्ला आपल्याला नेहमीच दिला जातो. कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अगदी सावधगिरीने आणि सावकाश प्रवास करणं अतिशय गरजेचं असतं. मात्र, बहुतेकदा लोक या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतात. आता याच संदर्भात एक बातमी समोर आली आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
1 जानेवारी 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत तब्बल 7 हजार 325 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या सर्व 7 हजार 325 वाहनचालकांचा सुमारे 1 कोटी 4 लाख 71 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वेग मर्यादा ओलांडल्यावर हलक्या वाहनांना 2 हजार रुपये तर जड वाहनांना 4 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येतो.
हा दंड ठोठावल्यामुळे पुणे – मुंबई एक्सप्रेस हायवेवरील अपघाताचे प्रमाण घटले आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनाला 100 किमी प्रतितास तर 9 पेक्षा अधिक प्रवासी क्षमतेच्या वाहनांना 80 किमी प्रतितास अशी वेग मर्यादा देण्यात आली आहे. याचे उल्लंघन केल्यास जागोजागी एक्सप्रेस वेवर असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये गाडीचा नंबर कैद होऊन हा दंड ठोठावला जात आहे.
पालघर जिल्ह्यात ई चलनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 75 हजार 16 वाहनधारकांनी दंड थकवला आहे. त्यांच्याविरोधात पालघर पोलिसांनी आता न्यायालयाचे दार ठोठावलं आहे. लोकन्याय अदालतीतून तीन कोटी 26 लाख 13 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.