मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ नोव्हेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दखल झाला आहे. ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात भाजप महिला कार्यकर्त्याकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनादरम्यान ही घटना घडली असल्याची तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच संतापलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यावर पोलिसी अत्याचार सुरू असून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल ठाण्यात होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन प्रलंबित उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात येणार होते. या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा पुलाचे लोकार्पण केल्यानंतर ते मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रवाना झाले. मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजप कार्यकर्त्या रिदा रशीद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि रिदा हे आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत रीदा रशीद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पुलाच्या उद्घाटनासाठी येणार यासाठी रिदा रशीद या दुपारी ४ वाजल्यापासून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होत्या. लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला असून या प्रकरणी लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशी मागणी रिदा यांच्याकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *