कृषिमंत्र्यांच्या मराठवाड्यात शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्यापासूनही वंचित राहावे लागत आहे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ नोव्हेंबर । मराठवाड्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्यापासूनही वंचित राहावे लागत आहे. मराठवाड्यात ३६ लाख ४५ हजार ३४५ शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यात तब्बल ६ लाख ९४ हजार ९११ शेतकऱ्यांचे दावे नाकारण्यात आले. कृषिमंत्री मराठवाड्याचे असताना येथील शेतकऱ्यांनाच मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. बुधवारी याबाबत अहवाल देण्याच्या सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व पीक विमा कंपन्यांना दिला. २,७७६ कोटी रुपयांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाने पाठवला. मात्र त्याच वेळी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांकडे पैसे भरलेले असताना पीक विमा कंपन्या शेतकरी आणि राज्य सरकारला दाद देत नसल्याचे समोर आले आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख २६,५५३ शेतकऱ्यांचे दावे फेटाळले आहेत.

कापूस पिकाला सर्वाधिक फटका मराठवाड्यात १३ लाख हेक्टरवर कापूस आहे. या पिकाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे आणि उरलेले नुकसान लाल्या रोगामुळे झाले. पहिल्या वेचणीतच कापूस संपून जात आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी कापूस उत्पादकांच्या नुकसानीची नोंद महसूल प्रशासनाने तर घेतलीच नाही. ज्यांनी कापसाचा विमा काढला आहे त्यांचे दावेदेखील फेटाळले. कापसानंतर सोयाबीनचे मराठवाड्यात नुकसान झाले.

दावे फेटाळण्याची कारणे { पीक विमा कंपन्यांकडे मनुष्यबळ नाही. { पीक कंपन्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता दावे फेटाळल्याचा दावा { नुकसानीनंतर ७२ तासांत तक्रार देणे बंधनकारक असते. पण उशिरा दावे दाखल झाल्याचे कंपन्यांचे म्हणणे { ऑनलाइन तक्रार करताना कंपनीचा फोन लागतच नाही. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तक्रारी करताना कंपनीची सुविधा कोलमडून पडते. { उशिरा तक्रार झाल्यावर कंपन्यांकडून शेतकरी अपात्र ठरवले जात आहेत.

शेतकऱ्यांना मदत न देता पीक विमा कंपन्या गब्बर होत आहेत मराठवाड्यात शेतकऱ्यांना मदत मिळण्याऐवजी पीक विमा कंपन्या गब्बर होत आहेत. मराठवाड्यातील राज्यकर्त्यांची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. परभणी जिल्ह्यात तर लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन बाळगून आहेत. याचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसत आहे. – माणिक कदम, शेतकरी नेते.

या कंपन्यांनी फेटाळले दावे औरंगाबाद : भारतीय कृषी विमा कंपनी, जालना : एचडीएफसी इर्गो इ.कं.लि. { बीड : बजाज अलायन्स ज.इ.कं.लि. { लातूर, उस्मानाबाद : भारतीय कृषी विमा कंपनी {नांदेड : युनायटेड इंडिया इ.कं.लि. {परभणी, हिंगाेली : आयसीआयसीआय लोंबार्ड ज.इ.कं.लि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *