शेलारांनी इंदिरा गांधींची पत्रच वाचून दाखवली ! राहुल गांधींवर पलटवार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात असलेल्या राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप, मनसे आणि शिंदेंची शिवसेना राहुल गांधींविरोधात आक्रमक झाली आहे, तर उद्धव ठाकरे यांनीही आपण राहुल गांधी यांच्या विधानाशी सहमत नाही, असं स्पष्ट केलं आहे. भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारयांनीही राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्यासाठी लिहिलेलं पत्रच आशिष शेलार यांनी वाचून दाखवलं.

‘सावरकर भारताचे सुपूत्र आहेत, असं इंदिरा गांधी त्यांच्या पत्रात करतात. त्यांचा उल्लेख इंदिरा गांधी वीर असा करतात, पण त्याच वीर शब्दावर राहुल गांधींनी ताशेरे ओढले. त्यांनी आजीचं पत्रही वाचलं नाही. सावरकरांचं युद्ध धाडसी होतं, ब्रिटीश सरकारविरुद्धच्या युद्धाची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केलं, असं इंदिरा गांधी पत्रात म्हणतात,’ असं आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

‘राहुल गांधींनी इंदिरा गांधी, नेहरूंचा अभ्यास केला नाही. केरळमधून निवडून आल्यावर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढाच अभ्यास त्यांनी केला आहे. राहुल गांधींचं विधान बेअक्कलपणा आहे, आम्ही याचा निषेध करतो,’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या मताशी सहमत नाही, असं सांगतानाच भाजपवरही निशाणा साधला. स्वातंत्र्य आंदोलनात भाजप आणि त्यांची संघ कुठे होता? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. यावरही आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.

‘उद्धव ठाकरेंनी बोटचेपी भूमिका घेऊ नये, ही अपेक्षा होती, पण त्यांनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपी भूमिका घेतली. सत्तेसाठी वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली. केशव बळीराम हेडगेवार स्वातंत्र्यपूर्तीच्या अभियानात सक्रीय होते. जे स्वत:च्या वडिलांचे विचार विसरले, ते इतिहास विसरले त्यात नवल ते काय,’ असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *