पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच काँग्रेस कार्यकर्त्याने लावले पोस्टर, वातावरण तापलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या घणाघाती टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या वक्तव्यावरून भाजप, मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना हे पक्ष आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मात्र ठामपणे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं जात आहे. अशातच आता पुण्यात या वादात आणखी एक ठिणगी पडली असून युवक काँग्रेसचे पदाधिकारी रोहन सुरवसे पाटील यांनी सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ असा उल्लेख करत पोस्टर लावले आहेत.

 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या या पोस्टरची शहरात चांगलीच चर्चा झाली. या पोस्टरवर संतापलेल्या जितेंद्र वाघ नावाच्या सावरकरप्रेमीने हे पोस्टर फाडून टाकलं आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तुरुंगातून सोडण्यासाठी ब्रिटिशांकडे पत्राद्वारे माफी मागून त्यांची चाकरी करण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. गांधी, नेहरूही कारागृहात राहिले. त्यांनी असे कुठलेही पत्र लिहिले नाही. सावरकरांनी हे केले, कारण ते घाबरले होते, असा दावा राहुल गांधी यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला होता.

गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाजन यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यावर आपले म्हणणे मांडले. राष्ट्रपुरुषांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करून राजकारण करणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले, अशी माहिती मंत्रिमंडळातील सूत्रांनी दिली. तसेच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत असे वक्तव्य करून त्यांचा अपमान केल्याचीच भावना यावेळी उपस्थित सगळ्या मंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *