रणजीत सावरकर म्हणाले- जिना हे राष्ट्रवादी आणि लोकमान्य टिळकांचे भक्तही होते

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ नोव्हेंबर । स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून महाराष्ट्रात राजकारण पेटलेले असतानाच आता या वादात मोहम्मद अली जिना यांचीही एंट्री झाली आहे.राहुल गांधींवर जोरदार टीका करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी म्हटले आहे की, मोहम्मद अली जिना हे पूर्वी राष्ट्रवादी होते. लोकमान्य टिळकांचे भक्त होते. जिना यांना काँग्रेसच्या व्यासपीठावरून हाकलून दिले गेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या जिनांनी त्या काळातील काँग्रेस नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते मुस्लिम लीगमध्ये सामील झाले. मुस्लीम लीगमध्ये सामील झाल्यानंतर जिना जातीवादी झाले.

रणजीत सावरकर यांनी जिना यांना राष्ट्रवादी म्हणताना महात्मा गांधींनी अनेक चुका केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. रणजीत सावरकर म्हणाले, 1920 मध्ये महात्मा गांधींनी देशासाठी काहीही मागितले नाही. डोमिनियन स्टेटचा दर्जाही मागितला नाही. स्वातंत्र्याच्या मागणीचा उल्लेखही केला नव्हता. सावरकरांनी सुरुवातीपासूनच देशाच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती आणि ते डोमिनियन स्टेटच्या दर्जापर्यंत आले होते. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की, शांततेच्या मार्गाने वाटचाल करून आपण पुढे पूर्ण स्वातंत्र्य मिळवू. असा दावाही रणजीत सावरकरांनी केला.

नेहरूंचा पुनर्जन्म राहुल गांधी म्हणून झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या चुका उघड करणे ही माझी जबाबदारी बनली आहे. नेहरूंच्या कार्यकाळात 12 वर्षे भारताची गोपनीय माहिती ब्रिटीशांपर्यंत पोहोचत राहिली. जर आम्ही आता प्रश्न विचारले नाहीत, तर भविष्यात देशाची माहिती इटलीला पाठवली जाईल, अशा शब्दांत रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे.

रणजीत सावरकर म्हणाले, वीर सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य करण्याची राहुल गांधींना जुनी सवय आहे. 2017 मध्येही त्यांनी असेच विधान केले होते. असे वक्तव्य केल्यानंतर ते वर्ष-दीड वर्ष गप्प बसतात. यापूर्वीही त्यांनी असेच विधान केले होते, त्यानंतर मी 2017 मध्ये गुन्हा नोंदवला आणि त्याला पोलिस चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास भाग पाडले. आताच्या त्यांच्या वक्तव्या प्रकरणी मी राहुल गांधींना भोईवाडा न्यायालयात (मुंबई) हजर राहण्यास भाग पाडणार आहे.

रणजीत सावरकर म्हणाले, राहुल गांधी जेव्हाही कोर्टात हजर होतात तेव्हा माफी मागतात. त्यांनी न्यायालयात अनेकदा माफी मागितली आहे. ‘महात्मा गांधींच्या हत्येत संघ परिवाराचा हात होता’, भिवंडीत केलेल्या या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींनी भिवंडी कोर्टात माफी मागितली आहे. त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले आहे. याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केली आहे. मला खात्री आहे की त्यांना या प्रकरणातही माफी मागावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *