महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ नोव्हेंबर । नवले पूल येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात जवळजवळ 48 गाड्यांचे नुकसान झाले. एका कंटेनरने तब्बल 48 गाड्यांना धडक दिली होती. यात सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघात झाल्यानंतर चालक फरार झाला होता. या ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मनीराम यादव असे या ट्रक चालकाचे नाव आहे.
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरवरील (एपी 02 टीई 5858) चालकाचे नियंत्रण सुटले आणि 48 गाड्यांना उडवत तो कंटेनर वाडगाव पुलाजवळ जाऊन आदळला होता. यानंतर तो चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तसेच, या अपघाताची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिले होते. तर, प्राथमिक माहितीनुसार ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे समोर आले होते. मात्र, तपासाअंती चालकाने उतारावरुन गाडी बंद केल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व अखेर आज ट्रक चालकाला पकडण्यात यश आले आहे. चाकणमधून मनीराम यादव याला ताब्यात घेतले आहे.