पुणे : नर्‍हे ते नवले पुलादरम्यान अतिक्रमणावर हातोडा !

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ नोव्हेंबर । मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवारस्त्यावर नर्‍हे ते नवले पुलादरम्यान करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या परिसरात रविवारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दहा जण गंभीर जखमी झाले. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, तर सुमारे 32 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासन यांनी मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून नर्‍हे येथील भूमकर चौक ते नवले पूल यादरम्यानच्या सेवारस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर बुलडोझर चढविले. ही कारवाई महामार्गापासून मोजमाप करून करण्यात आली. कारवाईदरम्यान नागरिकांचा विरोध होऊ नये, यासाठी महापालिका अतिक्रमण विभाग, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सुमारे 100 हून अधिक पोलिस कर्मचारी या वेळी बंदोबस्तावर होते. या कारवाईत दुकाने, घरे, इमारतींसमोरील ओटे, वाढीव शेड, कच्ची-पक्की बांधकामे जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

ही कारवाई चाळीस मजूर, तीन जेसीबी, एक ब—ेकर, एक पोकलेन, सात डंपर यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी संजय कदम, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड यांच्या मार्गदर्शनाने अंकित यादव, भारत तोडकरी, बांधकामप्रमुख रामचंद्र राव, राकेश कोळी, बी. जे. शर्मा, अभिजित गायकवाड, महापालिका अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड, अजित जोगळेकर, युवराज वाघ आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर, चार पोलिस निरीक्षक, सतरा अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

नवले पुलावर झालेल्या 48 वाहनांच्या विचित्र अपघातानंतर आता या रस्त्यावरील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या घटनेनंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने दरी पुलपासून नवले पुलार्यंत दोन्ही बाजूंना झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नवले पूल परिसरातील अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. रविवारी रात्री झालेल्या मोठ्या अपघातानंतर आता पुन्हा उपाय योजनांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात पोलिस आणि महापालिका प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत नवले पूल परिसरातील रस्त्यांलगत झालेल्या अतिक्रमणांबाबतही चर्चा झाली. त्यानुसार महापालिकेने दरी पुलापासून थेट नवले पुलापर्यंत दोन्ही बाजूंना झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येथील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजाविण्यात येणार असून, त्यानंतर कारवाईस सुरुवात करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *