आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यावर डोळा ; देवेंद्र फडणवीसांनाही थेट चॅलेंज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ नोव्हेंबर । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील (Maharashtra-Karnataka Border) 40 गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Karnataka CM Basavaraj Bommai) केलाय. सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मईंना प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असं सणसणीत उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) बसवराज बोम्मईंना दिलं. ज्या ठरावाचा उल्लेख बोम्मई यांनी केला आहे, तो ठराव 2012 साली केला होता. त्यानंतर कुणीही अशा प्रकारची मागणी केली नाही, असं स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिलं आहे. फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर बसवराज बोम्मईंनीही त्यांना थेट आव्हान दिलंय.

बोम्मई म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत यश आलं नाही आणि यापुढंही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी फडणवीसांना ठणकावून सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *