महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ नोव्हेंबर । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण लागले असून महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या सांगली जिल्ह्यातील तिकोंडी गावच्या गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये विलीन होण्याची इच्छा जाहीर केली आहे. गावात कर्नाटकचा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात आली तसेच गावच्या वेशीवरच्या कमानीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला आहे. दरम्यान, मिरज तालुक्यात कर्नाटकच्या अथणी-पुणे बसवर दगडफेक झाली. त्यानंतर दोन्ही राज्यांतील शासकीय बसेसची ये-जा बंद झाली आहे.
सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांवरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद चिघळला आहे. तिकोंडी गावापासून तीन किलोमीटरवर कर्नाटकातील विजयपूर जिल्हा आहे. तिकोंडी ग्रामस्थांनी शनिवारी तुबची-बबलेश्वर पाणी समितीच्या नेतृत्वा खाली कर्नाटकचा ध्वज घेऊन ग्रामपंचायतीसमोर बसस्थानकापर्यंत घोषणा देत पदयात्रा काढली. यामध्ये महातेश अमृतट्टी, वसीम मुजावर, महातेश रायचौड़ा, सोमनिंग चौधरी, अनिल हट्टी, रायगौंडा माडोळी यांचा समावेश होता.
कर्नाटकात जाणाऱ्या एसटीही बंद : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या आहते. खबरदारीचा उपाय म्हणून सीमा भागातून जाणाऱ्या सर्व बसेसच्या काचांना संरक्षित जाळ्या लावल्या आहेत, अशी माहिती सांगली विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नाराजीचे कारण…महाराष्ट्राचे फक्त आश्वासन, कर्नाटकने पाणी सोडले कर्नाटकने तीन वर्षांपासून तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी तिकोंडीजवळच्या तलावात सोडले आहे. कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सुविधा व अनुदान देते, तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार असे गेल्या ५० वर्षांपासून सांगत आहे. त्याच मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. पाणी देण्याचे गाजर दाखवत आहे. परंतु महाराष्ट्र सरकार आम्हाला कोणतीही सुविधा देत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावच्या वेशीवर बोम्मईंचा फाेटाे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४२ गावांचा कर्नाटकात समावेश करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले असून त्या विधानास पाठिंबा देण्यासाठी फेरी काढण्यात आली. गावातील कमानीवर बोम्मईंचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला. हा फलक पोलिसांनी नंतर काढून टाकला.
कानडी पोलिसांनी कागवाडला जाणाऱ्या बस रोखल्या : म्हैसाळ (ता. मिरज) गावाजवळ रात्री साडेदहा वाजता कर्नाटकची अथणी ते पुणे बस म्हैसाळपासून थोड्या अंतरावर आल्यानंतर अज्ञाताने पुढील काचेवर दगड मारला. यामध्ये काच फुटली. त्यानंतर कर्नाटक परिवहन मंडळाने महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. शिवाय सांगली, मिरज आगारातून अथणी, कागवाडला जाणाऱ्या बसेस कर्नाटक पोलिसांनी कागवाडजवळ रोखल्या आहेत.