महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ नोव्हेंबर । नियमित व्यायाम हा निरोगी आरोग्याचा मंत्र आहे. योगासनं, ध्यान, प्राणायाम या वेगवेगळ्या माध्यमातून आपले आरोग्य चांगले राहते. हे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे सुर्यनमस्कार. चांगलं आरोग्य राखण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी रोज किमान 10 सूर्यनमस्कार करणे महत्त्वाचे आहे. यामुळे यामुळे संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवाचा व्यायाम तर होतोच त्याचबरोबर रक्त शुद्धीकरण, पचन प्रक्रियाही सुधारते.
सूर्यनमस्काराची प्रकार आणि योग्य पद्धत
सूर्योदयाच्यावेळी सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक तर होतेच सोबतच मनाची एकाग्रता सुद्धा वाढते, असं कवडे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी ‘News18 लोकमत’ शी बोलताना सूर्यनमस्काराची प्रत्येक स्थिती योग्य पद्धतीनं कशी करावी याबाबत महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
1) नमस्कारासन : या प्रकारात स्तब्ध उभे राहून, पायाच्या टाचांमध्ये 45 टक्के कोन करून उभे राहावे. हात नमस्कार स्थितीमध्ये छातीजवळ ठेवून मान सरळ ताठ ठेवावी. श्वास घेऊन नमस्कार स्थितीमध्ये असलेले हात तसेच पुढे घेऊन आकाशाकडे पाहत थोडेसे मागे वळावे.(या सूर्यनमस्काराने पोटाचे विकार कमी होतात, उंची वाढण्यास मदत होते.)
2) हस्तपादासन : या स्थितीमध्ये कानाशी चिकटलेले हात तसेच ठेवून कंबरेपासून समोर वाकावे. हात जमिनीवर टेकावे. गुडघे न वाकवता हे करावे आणि श्वास सोडावा. (या सूर्यनमस्काराने अतिरिक्त चरबी कमी होऊन पोट पातळ होते.)
3) दक्षिणपादप्रसरणासन : यात डावा पाय पुढे घेत दोन्ही हातांच्यामध्ये ठेवून उजवा पाय लांब मागे ताणावा. छाती उंच करून वर आकाशाकडे पाहावे. ( या सूर्यनमस्काराने हृदयविकार, फुप्फुस विकार दूर होतात.)
4) द्विपादप्रसरणासन : या प्रकारामध्ये दोन्ही पाय मागे घेऊन हात पुढे घेऊन कंबरवर उचलावी. आपल्या शरीराचा भार हातपायांवर ठेवावा. (टीप- या सूर्यनमस्काराने पोट, अन्ननलिका यांना लाभ मिळतो.)
5)भुजान्वासन : यात गुडघे जमिनीवर टेकावेत व हनुवटीही जमिनीवर टेकवून हात पुढे करावेत.( या सूर्यनमस्काराने पाठीचा कणा आणि मान या अवयवांना लाभ मिळतो.)
6) साष्टांग प्रणिपातासन : यामध्ये संपूर्ण हात, पाय, छाती जमिनीला टेकवावी, पोट आत ओढून घेत श्वास सोडावा.(या सूर्यनमस्काराने छाती मोठी होते आणि पचनशक्ती वाढते.)
7) भुजंगासन : या प्रकारामध्ये पाय जमिनीवर ठेवून म्हणजे झोपून हात कोपऱ्यातून दुमडावे व जमिनीवर ठेवावे व मानेपासून वर पाहावे. ( या सूर्यनमस्काराने स्त्रियांचे गर्भाशय आणि मासिक पाळीचे विकार दूर होतात. मूत्राशयाचे विकारही दूर होतात.)
8) भूधरासन : यामध्ये हात, पाय जमिनीवर ठेवून कंबरेपासूनचा भाग वर उचलावा.डोळे दोन्ही हातांच्या मध्ये खाली करावेत. (या सूर्यनमस्काराने पोटाचे विकार कमी होतात.)
9) भुजान्वासन : यामध्ये गुडघे आणि डोके जमिनीवर ठेवून नितंब आपल्या टाचांवर ठेवावे व हात पुढे घ्यावेत. (या सूर्यनमस्काराने, मान, पाठीचा कणा, व श्वसननलिकेला लाभ मिळतो.)
10) दक्षिणपाद संकोचनासन : यात उजवा पाय समोर घेऊन दोन्ही हाताच्यामध्ये ठेवावा. डावा पाय मागे लांब ताणावा. छाती उंच करून वर आकाशाकडे पाहावे.(या सूर्यनमस्काराने मान, छाती आणि पोटाचे विकार नाहीसे होतात.)
11)हस्तपादासन : या प्रकारामध्ये कंबरेपासून खाली वाकावे. गुडघे न वाकवता हात जमिनीवर टेकावेत. ( या सूर्यनमस्काराने उंची वाढते, पोट पातळ होते)
12) नमस्कारासन : यात सरळ ताठ उभे राहून, हात जोडलेल्या अवस्थेमध्ये छातीजवळ ठेवावे. (या सूर्यनमस्काराने मन शांत होण्यास मदत करते.)