देशासाठी लढा दिला त्यांची बदनामी करून हाताला काय लागणार ? मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ नोव्हेंबर । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता.२७) मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. राहुल हे म्हैसूर सँडल सोपप्रमाणे गुळगुळीत मेंदूचे असल्याचा टोला त्यांनी लगावला. महापुरुषांची बदनामी थांबवण्याचे आवाहन त्यांनी सर्वपक्षीयांना केले. तब्येतीची कारणे सांगून घरात बसणारे राज्य गेल्यावर सर्वत्र फिरत आहेत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

गोरेगावमधील नेस्को सभागृहात आज मनसेच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज बोलत होते. राहुल यांच्यावर टीका करताना राज म्हणाले, ‘राहुल गांधी यांची सावरकरांवर बोलायची लायकी नाही. ५० वर्षांची शिक्षा झालेला माणूस बाहेर येण्यासाठी अर्ज करतो. बाहेर आल्यावर हंगामा करू ही रणनीती होती. ही रणनीती ज्याला समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा असतो,’ असा आरोप त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. यासाठी राज यांनी कृष्णनीती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगसोबत केलेल्या कराराचा दाखला दिला. ‘पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी कशा वाईट होत्या हे सांगणे बंद करा. ज्यांनी देशासाठी लढा दिला त्यांची बदनामी करून हाताला काय लागणार आहे,’ असा सवाल त्यांनी काँग्रेस आणि भाजपला केला. ‘प्रत्येक माणूस हा गुणदोषांसह स्वीकारावा लागतो. ज्याच्याकडे जे गुण आहेत ते हेरा आणि महाराष्ट्र समृद्ध करा,’ असे आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केले.

पदाधिकाऱ्यांचे कान टोचले राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकदीने उतरा, मुंबई महापालिका तुमच्या हातात आणून देतो, असा शब्द दिला. जे काम सांगितले ते करा, लोकांशी नम्रतेने बोला. शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष काम व्यवस्थितपणे करत नसेल तर माझ्यापर्यंत कळवा. हुजरे निर्माण करणारे पदाधिकारी नको आहेत, या शब्दांत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. राज यांची आजची सभा मुंबई महापालिका निवडणुकीचे फुंकलेले रणशिंग असल्याचे मानले जाते. २२७ नगरसेवकांच्या मुंबई पालिकेत मनसेचा एकच नगरसेवक आहे.

एकनाथ शिंदेंनी रात्रीतून कांडी फिरवली ‘काल-परवा मुख्यमंत्रिपदावर असलेले तब्येतीची कारणे सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवल्यानंतर ते सगळीकडे फिरत आहेत. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचे, असले धंदे मी करत नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे वाभाडे काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *