पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; चालकाचं नियंत्रण सुटलं, ८ प्रवासी असलेला पिकअप उलटला!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर । मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाले. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला.

याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींवर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत.

पिकअप वाहनचालकाच्या म्हणण्यानुसार माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे आमचे वाहन पलटी झाले. गेल्या आठवड्यात सात दिवसांत आठ अपघात या परिसरात झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

काहीच दिवसांपूर्वी, साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणारा ट्रक कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना या ट्रक चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना उडवत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतूक बराच वेळ थांबवावी लागली. पुण्यातील नवले पूल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्यांची चुकलेली रचना, यासाठी कारणीभूत आहे. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पूल अपघातांचं हॉटस्पॉट बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *