पाचवा सिक्स मारला, तेव्हा एकच चेहरा डोळ्यासमोर आला, ऋतुराजने सांगितलं…….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० नोव्हेंबर । ऋतुराज गायकवाड ना यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता, ना त्याला टी२० विश्वचषक संघात स्थान मिळालं. अगदी न्यूझीलंड दौऱ्यावरही त्याचा टीम इंडियात समावेश झालेला नाही. मात्र भारतीय संघापासून खूप दूर असूनही, ऋतुराज गायकवाड सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळातील सर्वात मोठा सुपरस्टार ठरला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात दमदार खेळी केली. एकाच षटकात ७ षटकार ठोकत त्याने लिस्ट ए (प्रथम श्रेणी) क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला. ऋतुराजने एका षटकात ४३ धावा चोपल्या. षटकात पाचव्या चेंडूवर गोलंदाजाने नो बॉल टाकला, त्यावरही ऋतुराजने षटकार ठोकला.

ऋतुराजने १५९ चेंडूत २२० धावांची तुफान खेळी केली. १० चौकार आणि १६ षटकारांचा साज चढवत त्याने संघाची धावसंख्या ३०० पार नेली. सामनावीराचा किताबही ऋतुराज गायकवाडने पटकावला.

महाराष्ट्राकडून खेळताना ऋतुराजने सोमवारी उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंगच्या ४९ व्या षटकात सात षटकार मारून प्रथम श्रेणीत विश्वविक्रमाची नोंद केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगला.

ऋतुराजच्या या पराक्रमाने सर्व भारतीय चाहत्यांच्या मनात युवराज सिंगच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. युवराजने २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. तेव्हापासून युवराजची ‘सिक्सर किंग’ अशी ओळख निर्माण झाली.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एकामागून एक षटकार मारत असताना ऋतुराज युवीसारख्या अष्टपैलू खेळाडूला कसा विसरेल. हा टप्पा गाठण्यापूर्वी त्याच्या मनात आलेलं पहिलं नाव म्हणजे युवराज सिंग.

या शानदार खेळीनंतर त्याने बीसीसीआय टीव्हीला प्रतिक्रिया दिली. ‘खरं सांगायचं तर, पाचव्या षटकारानंतर माझ्या मनात फक्त एकाच व्यक्तीचे नाव आले, ते म्हणजे युवराज सिंग. मी खूप लहान असताना २००७ च्या टी२० विश्वचषकात त्याला एका षटकात सहा षटकार मारताना पाहिले.’ असं ऋतुराज म्हणाला.

“मलाही त्यांच्यासोबत स्वतःचं नाव जोडलेलं पाहायचं होतं. म्हणूनच मला सहावा षटकार मारायचाच होता. मी सलग सहा षटकार मारेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.” असंही ऋतुराज म्हणाला.

‘जेव्हा मी सहावा षटकार मारला तेव्हा मला वाटले की सातव्यासाठी प्रयत्न का करू नये. मी सहा किंवा सात षटकार मारण्याचा नाही, तर त्या षटकात जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला होता. संघासाठी जास्तीत जास्त धावा करण्याचा माझा प्रयत्न होता. याचं श्रेय मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या कुटुंबातील सदस्यांना, महाराष्ट्रातील जनतेला देऊ इच्छितो, असंही ऋतुराज प्रांजळपणे म्हणतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *