महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील गावांवर दावा केल्यामुळे पेटलेला सीमावाद आठ-दहा दिवसांपासून धुमसत आहे. आता महाराष्ट्र- कर्नाटकातील सर्वच राजकीय पक्षांनी यात उडी घेतलीे. ‘कर्नाटक वेदिका’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसे, उद्धवसेनेने मुंबई, कोल्हापूर, देगलूर, औरंगाबादेत कर्नाटकातील वाहने अडवून काळे फासले.
तोडफोडीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या ११५० पैकी ३८० बसफेऱ्या एसटीने रद्द केल्या. वाद चिघळत असतानाही बोम्मई दाव्यांवर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी-उद्धवसेनेने संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनीही अमित शहांकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र तरीही पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांनी या वादात मध्यस्थी करण्याचे गांभीर्य दाखवले नाही.
…हे तर महाराष्ट्रविरोधी षड्यंत्र : सुप्रिया सुळे
‘गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रविरोधी षड्यंत्र रचले जात आहे. बोम्मई महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतात, मराठी माणसांना मारहाण होतेय, हे चालणार नाही. दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहांनी भूमिका स्पष्ट करावी,’ अशी मागणी खा. सुप्रिया सुळे, खा. अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली.
लोकसभेत आमने-सामने घोषणा
सुप्रिया बोलत असताना त्यांना उद्धवसेनेच्या खासदारांनी समर्थन दिले. त्यावर कर्नाटकच्या भाजप खासदारांनीही घोषणा देत प्रत्युत्तर दिले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, हा दोन राज्यांचा वाद असून कोर्टात प्रकरण सुरू आहे. यात केंद्र सरकार काय करणार?
बोम्मई : भूमिका बदलणार नाही
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी माझी फोनवर चर्चा झाली. दोन्ही राज्यांत कायदा व सुव्यवस्था, शांतता राखण्याला आमचे प्राधान्य असेल. पण सीमाभागाची आमची भूमिका बदलणार नाही. न्यायालयीन लढाई यापुढे सुरूच राहील.
शिंदे-फडणवीसांचे शहांना फोन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठी माणसांना त्रास होऊ नये, हल्लेखोरांवर कारवाई करा, असे मी बोम्मईंना सांगितल्याचेही शिंदे म्हणाले.