महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । हिमाचल प्रदेश निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच कल समोर येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 31 जागांवर पुढे आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाचे खातेही अद्याप उघडले गेले नाही. मतमोजणी सुरू झाली, त्यावेळी भाजप आघाडीवर होता. मात्र नऊ वाजेपर्यंत काँग्रेसने भाजपला मागे टाकत बाजी मारली आहे.
सकाळी 9.00 वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार हिमाचल प्रदेशमधील एकूण 68 विधानसभा जागांपैकी 50 हून अधिक जागांचे कल समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत काँग्रेस 35 जागांवर तर भारतीय जनता पक्ष 31 जागांवर आघाडीवर आहे.
हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. येथे मुख्य लढत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आहे. आम आदमी पक्षानेही याठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.
हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास प्रतिभा सिंह मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार ठरू शकतात. प्रतिभा सिंह या मंडीच्या खासदार आहेत आणि राज्यात पक्षाच्या प्रमुख आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करून निवडणुकीत उतरवले आहे.
गुजरातमधील कल –
गुजरात निवडणुकीचे कलही हाती आले आहेत. गुजरातमध्ये जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. भाजप विक्रमी विजयाच्या दिशेनं आहे. गुजरातमध्ये भाजपला 135 ते 145 जागा मिळतील,असा अंदाज हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला आहे