महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळल्या गेला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.
बांगलादेश दौऱ्यावर रोहित आणि ब्रिगेडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. आता या पराभवानंतर मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेश दौऱ्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आढावा बैठकीसाठी बोलावले आहे.
इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा पराभव आत्मसात खूप कठीण आहे. बांगलादेश मालिकेनंतर लगेचच आम्ही प्रलंबित आढावा बैठक घेणार आहोत. भारताच्या खराब कामगिरीमुळे बोर्ड अचंबित झाला आहे. त्याचबरोबर संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंचे वाढते प्रमाणही बोर्डासाठी चिंतेचा विषय आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने बांगलादेश दौऱ्यानंतर मुंबईत संघाची आढावा बैठक बोलावली आहे.