महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ डिसेंबर । राज्यात वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं होतं . मात्र, हे राजकारण चांगलंच तापलं आहे. आता या प्रकरणी 11 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. #chandrkantatil #Pune pic.twitter.com/mSLEjBEmAO
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) December 11, 2022
चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात 11 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 8 पोलिस कर्मचारी आहेत. तर यामध्ये 3 पोलिस अधिकारी आहेत. चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं होतं. कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडला कसा यावरून प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी दौऱ्यावर असताना झालेल्या शाईफेक प्रकरणी समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड सचिवांना अटक केली आहे. समता सैनिक दलाचे संघटक आरोपी मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओवाळ यांना हे कृत्य केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अटक केली. या तिघांवरही भादवि कलम 307,353,294,500,501,120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय.