नववर्षात मुंबई-कोकणात राज ठाकरे घेणार तीन सभा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ डिसेंबर । आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई आणि कोकणात सभा घेणार असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. यानुसार ते मुंबईत एक तर, कोकणात दोन सभा घेणार आहेत. दरम्यान, रेल्वे भरतीदरम्यान उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणीविरोधात अॅड. मिथिलेशकुमार पांडे यांनी दिल्लीत दाखल केलेल्या याचिका मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा पांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत यांनी ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेनंतर पांडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चादेखील केली. मनसेच्या पक्षनिर्मितीच्या वेळी महाराष्ट्रात विविध आंदोलने झाली. त्यावेळी राज ठाकरे यांची भाषणे चुकीच्या पद्धतीने देशभरात जात होती. त्यामुळे आम्ही उत्तर भारतीयांविरोधात आहोत, असा सर्वत्र समज झाला. त्यावेळी अनेक राज्यांत राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकाही होत्या. मात्र या याचिका मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी सीमावादाविषयी अगोदरच भूमिका जाहीर केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बेलगाम वक्तव्य करत असून अशाप्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे असल्याचे नांदगावकर म्हणाले. महाविकास आघाडीतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाविषयीही त्यांनी मतप्रदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. त्याविरोधात मोर्चा काढला जात असून त्यात सहभागी व्हायला हवे असे नाही. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका जाहीर करतील, असे ते म्हणाले. लव्ह जिहाद कायदा आणला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *