महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ डिसेंबर । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष, संघटनांनी आज (दि. १३)बंद पुकारला आहे. बंदमुळे शहरात सकाळपासून शुकशुकाट आहे. शहरातील बहुतांश दुकाने, हॉटेल सकाळपासून बंद होती. बंदमुळे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बंदमुळे शहरातील व्यवहारावर परिणाम झाला आहे. पीएमपी बस सेवा तसेच रिक्षाही बंद आहेत. शहरातील हॉटेल, दुकाने बंद आहेत. सकाळपासून शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला आहे. लक्ष्मी रस्तामार्गे मोर्चा शिवाजी रस्त्यावर लाल महाल चौकात जाणार आहे.मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चाच्या मार्गावर लक्ष्मी रस्ता परिसरात दोन्ही बाजूस भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. हडपसर, कात्रज, नगर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरुड, वारजे, येरवडा परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.