महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ डिसेंबर । राज्यात आज देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता . अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय. 11 ते 13 डिसेंबर या कालावधील राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. तर पुढील 48 तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील वसमत तालुका आणि परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, ज्वारी आणि तूर या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झालाय. या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या हरभरा, गहू, तूर, पेरू, बोरे आणि सीताफळाच्या बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसलाय.
परभणी शहरासह परिसरात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली . दुपारी जवळपास अर्धा तास पाऊस बरसलाय. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. तर या पावसामुळे तूर, कापूस फळपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अमरावतीत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. परंतु, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकाला फटसा बसण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातीत ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
वर्ध्या जिल्ह्यासह परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. आधीच थंडी आणि त्यात अवकाळी पाऊस बरसत असल्याने वातावरणात अधिक गारवा निर्माण झालाय. तर शेतीपिकांना मात्र अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.