कोटक महिंद्राच्या ग्राहकांना मिळणार हा फायदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ डिसेंबर । आरबीआयने नुकतेच रेपो दरात ०.३५ टक्के वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याज वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेनेही ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. या खासगी क्षेत्रातील बँकेने एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत.

कोटक महिंद्रा बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर १४ डिसेंबर २०२२ पासून लागू झाले आहेत. वाढलेले दर घरगुती, एनआरओ आणि एनआरई ठेवींवर लागू होतील. यापूर्वी एसबीआयनेही एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती.

बँकेने निवडक कालावधीसाठी व्याजदर वाढवले आहेत. बँक आता १८० दिवसांच्या कालावधीसाठी ५.७५ टक्के व्याज देत आहे. या आधी हा दर ५.७५ टक्के होता. बँक नियमित नागरिकांना सहा महिने ते 10 वर्षे कालावधीसाठी ५.७५ टक्के ते ६.७५ टक्के व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ६.२५ ते ७.२५ टक्के व्याज दिले जात आहे.

बँकेच्या वेबसाइटनुसार, ज्येष्ठ नागरिकांचा मुदत ठेवी व्याजदर NRO किंवा NRE खात्यांना लागू होणार नाही. NRE एफडी कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्यास कोणतेही व्याज दिले जाणार नाही. बँकेचे म्हणणे आहे की जर एफडीचा कालावधी १८० दिवसांपेक्षा कमी असेल तर मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्यासाठी कोणताही दंड लागणार नाही. हा कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त आणि ३६४ दिवसांपेक्षा कमी असेल तर ०.५० टक्के दंड आकारला जाईल. त्याचप्रमाणे, ३६५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी असल्यास, हा दंड एक टक्का असेल.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानेही (एसबीआय) एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एफडीचे दर ०.६५ टक्क्यांनी वाढवले आहेत. आरबीआयने नुकतीच रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर एसबीआयने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एफडीवरील व्याज ०.२५ ते ०.६५ टक्क्याने वाढवले आहे. ही वाढ २ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर करण्यात आली आहे. वाढलेले दर १३ डिसेंबरपासून लागू झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *