महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ डिसेंबर । निगडी परिसरात सेक्टर 22 मध्ये विविध ठिकाणी गावडुक्करांचा प्रादुर्भाव वाढला असून ही भटकी डुकरे रस्त्यावर कुठेही मोकाट फिरत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कचरा कुंडी किंवा सोसायटी तसेच भक्ती-शक्ती उद्यानासमोर, भक्ती-शक्ती उड्डाणपूल शेजारी प्राधिकरण पोलिस चौकी व आण्णा भाऊ साठे बस स्टॉप पाठीमागे मोठ्या प्रमाणात डुक्करांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या डुक्करांचा बंदोबस्त महापालिका प्रशासनाने करावा अन्यथा महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी या भटक्या डुकरांची व्यवस्था करावी, अशी आक्रमक मागणी, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुकांना इमेलद्वारे निवेदन देऊन केली आहे.
सदर निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. शहराती मोकाट जनावरे, कुत्री, डुकरे पकडण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. मात्र ही भरारी पथके केवळ नावापुरती स्थापन करण्यात आली आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून डुकरांचा प्रादुर्भाव जरा जास्तच वाढला आहे. सेक्टर 22 ह्या ठिकाणी ६० ते ७० डुकरे आहेत. ठिकठिकाणच्या कचरा कुंड्यांवर कळपाने जत्थाच्या जत्था सकाळ, दुपार, सायंकाळी पहायला मिळतो. त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा.
डुकरे पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची भरारी पथके निष्क्रिय ठरत आहेत. परिणामी डुक्कर व भटकी कुत्री ह्यांना रस्त्यावर फिरताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन कारवाई करत नाही. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी डुक्करांच्या निवासाची जागा उपलब्ध करून व्यवस्था करावी, जेणेकरून रस्त्यावर डुकरे फिरणार नाहीत. त्याचप्रमाणे प्रशासनास जाग येऊन, भरारी पथके डुकरांना ताब्यात घेतील.
शहरात मोकाट जनावरांना पकडण्यासाठी भरारी पथके कुचकामी
पिंपरी-चिंचवड शहरात डुकरे खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालीकेची भरारी पथके डुकरे पकडण्यासाठी तसेच यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कुचकामी ठरत आहेत. या भरारी पथकांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन एक प्राणी पकडण्यासाठी सहाशे रुपये मानधन देते. मात्र महापालिकेचे या उपद्रवी डुकरांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य होत आहे. त्यामुळे डुकरांची व्यवस्था आयुक्तांच्या निवासस्थानी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.