महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ डिसेंबर । शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर महापालिकेकडून आता 140 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांचे काम केल्यानंतर त्यावर पुन्हा खड्डे पडू नयेत, यासाठी पालिकेने आता तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात समान पाणीपुरवठा योजना आणि सांडपाणी वाहिन्यांसह विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदकाम करण्यास परवानगी दिली जाते. मात्र, या खोदकामामुळे शहरातील रस्ते खड्डेमय होतात.
या पार्श्वभूमीवर पावसाळा संपल्यानंतर पालिकेने शहरातील सुमारे 140 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 109.8 किलोमीटर लांबीचे रस्त्याची कामे तर दुसर्या टप्प्यात 42 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे केली जाणार आहेत. ही कामे करताना अद्ययावत पद्धतीने तांत्रिक परीक्षण केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने फॉलिंग वेट डिप्लेक्टोमीटर (एफडब्ल्यूडी) या नवीन पद्धतीच्या रस्ते तपासणी यंत्राचा वापर केला जाणार आहे.
या यंत्राद्वारे डांबरी रस्त्याची सध्याची स्थिती, क्षमता तसेच वापरलेल्या थराची क्षमता तपासून त्यावर नव्याने डांबराचा थर किती जाडीचा टाकायचा हे ठरवले जाते. तसेच रस्त्याच्या उर्वरित आयुर्मानाचाही अंदाज बांधता येतो, अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
याचबरोबर संबंधित रस्त्यावरून वाहन चालविण्याची क्षमता (राइड क्वालिटी) तपासण्यासाठी बंप इंटिग्रेटर या यंत्रणेचा वापर करून रस्त्याची कामापूर्वीची स्थिती आणि कामानंतरची स्थिती याची सांगड घातली जाणार आहे. भारतीय रस्ते काँग्रेस (आयआरसी) च्या मानांकनानुसार रस्त्याचा दर्जा राखणे यामुळे शक्य होणार आहे. तर काँक्रिटचे रस्ते करताना व्हाइट टॉपिंगसाठी आयआरसीनुसार बेन्कलमन बीम यंत्रणेचा वापर करून रस्त्याची वाहक क्षमता तपासण्यात येणार आहे.