पिंपरी चिंचवड ; मिळकतकर भरा… अन्यथा ! थकबाकी वसुली मोहीम तीव्र करणार : महानगरपालिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ डिसेंबर । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने मिळकतकर थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. विभागीय कार्यालयाचे स्वतंत्र 17 पथके तयार करून ती धडक मोहीम राबविली जाणार आहे. तसेच, जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. महापालिकेकडे शहरातील 5 लाख 91 हजार मिळकतींची नोंद आहे. त्यापैकी आतापर्यंत 520 कोटींचा भरणा झाला आहे. तर, तब्बल अडीच लाख मिळकतधारकांनी अद्याप मिळकतकर भरलेला नाही. येत्या 31 मार्च 2023 पर्यंत केवळ तीन महिन्यांमध्ये करसंकलन विभागाला 480 कोटी रुपये कर वसूल करण्याचे टार्गेट आहे.

थकबाकी वसुलीसाठी करसंकलन विभागाच्या वतीने सध्या आठ पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांच्या वतीने शहरातील थकबाकीदारांच्या घरी जाऊन त्यांना कर भरण्याचे आवाहन केले जाते. तसेच, तृतीयपंथीयांचे स्वतंत्र पथक नेमले आहेत. अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची मालमत्ता सील केली जात आहे. मनुष्यबळ कमी असल्याने ही कारवाई थकबाकीदारांच्या संख्येच्या तुलनेत नगण्य आहे.

करसंकलन विभागाच्या शहरात 17 विभागीय कार्यालये आहेत. या 17 विभागांचे 17 पथक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. एका पथकाकडून दररोज 10 ते 15 थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे नियोजन आहे.
ही धडक कारवाई मोहीम नवीन वर्षांपासून हाती घेतली जाणार आहे. 31 मार्च 2023 पर्यंत 1 हजार कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *