महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ डिसेंबर । पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) सातारा बाजूकडं जाताना आज सकाळपासून ‘चक्का जाम’चा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
घाटामध्ये रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असल्यामुळं सकाळी सात वाजल्यापासून सातारा बाजूकडं जाणारी वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे. यामध्ये वाहनांचे इंजिन अधिक गरम झाल्यामुळं अनेक गाड्या रस्त्यावरच बंद पडल्या, त्यामुळं वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस फरांदे व महामार्ग पोलिसांनी टोकण लावून वाहनं बाजूला केली. तरीही घाटात वाहनांच्या रांगा लागल्या असून, खंबाटकी घाटातून बाहेर पडण्यासाठी एक ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. त्यातच शनिवार-रविवार जोडून सुट्टी असल्यामुळं लोक सुट्टी प्लान करुन फिरायला जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, प्रवाशांना या कोंडीचा सामना करावा लागत आहे.