महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ डिसेंबर । मुंबईसह राज्यभरात तापमानात कमालीची घसरण झाली. त्यामुळे मुंबईकरांनाही हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. आज सांताक्रूझ येथील किमान तापमान १५ अंशापर्यंत खाली घसरल्याचे दिसले. हा तापमानाचा या मोसमातील नीचांक आहे. पुढील दोन दिवस मुंबईत बोचरी थंडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दोन दिवसांपूर्वी किमान तापमानात घसरण व्हायला सुरुवात झाली आहे. पहाटे जाणवणाऱ्या गारव्यामुळे शेकोटीची गरजही भासू लागली आहे. अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरत असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट आल्याचा परिणाम
1 उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने त्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरात दिसू लागला आहे. मुंबईतील किमान तापमानात घसरण झाली आहे.
2 रविवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १५ अंशावर, कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान १८.५ अंशांपर्यंत खाली आले आहे.
3 शनिवारच्या तुलनेत सांताक्रूझ येथील किमान तापमान एक अंशाने आणि कुलाबा येथील ०.३ अंशाने कमी झाले. किमान तापमान अनुक्रमे ३ व २ अंशांनी कमी झाले.
आणखी दोन दिवस थंडी
पुढील आणखी दोन दिवस थंडी जाणवण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू तापमान वाढण्याचा अंदाज आहे. सध्या उत्तरेकडून वाहणारे वारे हे कोरड्या स्वरूपाचे आहेत; मात्र येत्या दोन दिवसांत दक्षिण दिशेकडून वारे वाहू लागतील. ते दमट स्वरूपाचे असतील. त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
तलासरी, बदलापूर सर्वाधिक थंड
बदलापूर – यंदाच्या मोसमात शहरात सगळ्यात कमी तापमानाची नोंद आज झाली. शहरात ९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पालघर जिल्ह्यातील तलासरी या तालुक्याच्या ठिकाणी सर्वाधिक कमी म्हणजे ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
जानेवारीत शहरातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद (८.९ अंश सेल्सिअस) झाली होती. मागील महिन्यातदेखील कोकण विभागात सर्वांत कमी तापमान १० अंश नोंद करण्यात आली होती. जानेवारीत याहीपेक्षा कमी तापमानाची नोंद होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याचे अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.