महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बीड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड -: जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी बुधवारी पहाटे नागरिकांना दिलासा देणारा आदेश प्रसारित केला आहे. या आदेशानुसार विषम दिनांकास संचारबंदी शिथिलतेचा कालावधी वाढवण्यात आला असून दहा जणांच्या उपस्थितीत घरगुती विवाह करण्यास देखील परवानगी दिली आहे. आदेशातील अन्य तरतुदी खालील प्रमाणे आहेत.
• विषम दिनांकास सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधी मध्ये ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्याची दुकाने (किराणा दुकानासह, परंतु भाजीपाला व फळे यांची दकाने वगळून) उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. हायकोर्टाच्या निर्देशान्वये Needly App च्या वापरा विषयीच्या आदेशास कसल्याही प्रकारचा प्रतिबंध नसला तरीही त्याचा वापर सर्व किराणा दुकानदारांच्या सहकार्याने सुरु करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर येणे टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.
• सर्व घाऊक (whole sellers) विक्रेत्याची दुकाने विषम दिनांकास दुपारी ३ वाजता नंतर आणि सम दिनांकास पूर्ण दिवस खुली राहण्यास परवानगी देण्यात येत आहे. याच काळामध्ये किरकोळ दुकानांना त्यांच्या दुकानात घाऊक विक्रेत्याकडून किंवा अन्य मार्गाने सामान आणण्यासाठी ही परवानगी देण्यात येत आहे.
• विषम दिनांकास सकाळी ६.३० ते दु.२.३० वा या काळागध्ये शहरी भागामध्ये रार्व प्रकारच्या मालवाहू गाडया (पिकअप व्हॅन, छोटा हत्ती. ट्रक इ. सह सर्व) यांना प्रवेशास मनाई असेल.
• वाहतूक पास असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस चार चाकी,अॅटो, दुचाकी यांच्या वापरासशहरी भागात संपूर्ण मनाई असेल.परंतु शासकीय शाळा, वसतीगृहे इ.बंद असणाऱ्या शासकीय आस्थापनावरील कर्मचारी वगळून इतर सर्व शासकीय कर्मचारी. बँक कर्मचारी व इतर जीवनावश्यक सेवेतील व्यक्ती यांना सवलत देण्यात येत आहे.
• वाहनास इंधन यापूर्वीचे निर्देशाप्रमाणेच देण्यात यावे.
• वधू व वरा व्यतिरिक्त १० पेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाहीत, अशा घरगुती विवाहास परवानगी देण्यात येत आहे.
• केश कर्तनालय, ब्युटी पार्लर यांच्यासाठी याआधीचे आदेश कायम राहतील.
• ज्या कामांना आधी कोणत्याही विषम दिनांकास सकाळी ७.०० ते ९.३० मध्ये करण्यास परवानगी होती ती सर्व कामे करण्यास आता सर्व विषम दिनाकांना सकाळी ०७.०० ते दु.२.०० वा या काळात (बँकासह) परवानगी असेल.
• शहरी भागातील व्यावसायिक परिसरातील सर्व प्रकारची शासकीय तसेच खाजगी बांधकामे व रस्त्यांची कामे विषम दिनांकांस सकाळी ६.३० ते दु.२.३० ही वेळ वगळता करता येतील, परंतु या कामामुळे कोणत्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा अथवा गर्दी होऊ नये.
हे आदेश आजपासून म्हणजेच बुधवार, दि. १३ मे रोजीपासून लागू असणार आहेत. त्यासोबतच नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळावेत, मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्यासही सांगण्यात आले आहे. या आदेशामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गास मोठा दिलासा मिळाला आहे.