ओव्हर स्पीड नव्हे तर… ऋषभ पंतने सांगितलं अपघाताचं खरं कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ डिसेंबर । भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा दिल्लीहून त्याच्या घरी जात असताना अपघात झाला. यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून त्यात गाडीचा वेग जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. तर काहींनी ऋषभ पंतला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा असं म्हटलं आहे. मात्र आता पंतनेच अपघाताच्या कारणाबद्दल खुलासा केला आहे.

अपघातानंतर रुर्कीतील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची भेट घेण्यासाठी डीडीसीएचे पथक पोहोचले आहे. डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांच्यासोबत बोलताना ऋषभ पंतने अपघाताबद्दल खुलासा केला. ऋषभ पंतने म्हटलं की, गाडी चालवत असताना रस्त्यात एक खड्डा आला. तो खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतला अपघाताबाबत विचारले होते. तेव्हा त्यांच्याशी बोलताना पंतने म्हटलं की, “रात्रीची वेळ होती आणि रस्त्यावर समोर खड्डा असल्यासारखं मला दिसलं. तेव्हा खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीचा अपघात झाला.” ऋषभ पंतला उपचारासाठी गरज पडली तर एअर लिफ्ट करण्याची तयारी डीडीसीएने केली आहे. पण सध्या त्याला दिल्लीला हलवण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. तसंच लेगामेंट उपचारासाठी लंडनला जावं लागले तर त्याबाबत बीसीसीआय निर्णय घेईल.

ऋषभ पंत दिल्लीतून रुर्कीत आपल्या घरी आईला भेटण्यासाठी निघाला होता. तेव्हा दिल्ली डेहराडून महामार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याचा अपघात झाला. महामार्गावर असलेल्या दुभाजकाला धडकल्यानंतर गाडीवरचे नियंत्रण सुटले. यानंतर गाडी अनेकदा उलटली आणि आगही लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *