महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ जानेवारी २०२३ । आज वर्षाचा पहिला दिवस आहे. जगभरात नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येते. नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केल्याचं पहायला मिळत आहे. दरवर्षी लाखो भाविक हे देवाच्या दर्शनाने आपल्या नववर्षाची सुरुवात करतात. त्यामुळे आज राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. पंढरपूर, शिर्डीसह इतर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. नववर्षांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.
मंदिराची आकर्षक सजावट
देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिनी मंदिर समितीने नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवले आहे. देवाचा गाभारा , सोळखांभी मंडप ,चौ खांभी मंडप फुलांनी सजवला आहे. श्री विठुरायचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे.
दुसरीकडे नवीन वर्षाचे स्वागत साई दरबारी करता यावे म्हणून लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. देश विदेशातून आलेल्या साईभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी आणि वाद्याच्या तालावर नृत्य करत साईभक्तांनी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी साई दरबारी नवीन वर्षाची सुरुवात करताना साईभक्तांचा आनंद ओसंडून वाहत आहे. पंढरपूर, शिर्डी प्रमानेच शेगावमध्ये देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.